
अघोरी पूजेसाठी पोटच्या आठ वर्षाच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न सतर्क नागरिकांनी हाणून पाडला. संतप्त नागरिकांनी नराधम पित्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कानपूर जिल्ह्यातील बिधनू परिसरात ही घटना घडली. मुलीने आरडाओरडा केल्याने आसपासचे लोक धावून आले आणि मुलगी सुखरुप बचावली. सौरभ सैनी असे आरोपीचे नाव आहे.
सौरभ दीर्घकाळापासून मानसिक आजाराने ग्रस्त असून तो तांत्रिक विद्या आणि अंधश्रद्धेच्या आहारी गेला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. सौरभला घर बांधण्यासाठी 80 हजार रुपये दिले होते. मात्र त्याने घर बांधण्याऐवजी या पैशाने ट्रॉली बॅग, झोपाळा, मुलीसाठी नवीन कपडे, महागड्या साड्या आणि मेकअपचे साहित्य आणले, असे सौरभचा भाऊ राहुल सैनी याने सांगितले. यानंतर शनिवारी सौरभने स्वतः नवीन साडी नेसली, मुलीला नवीन ड्रेस घालून रामगंगा कालव्याजवळ निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे मुलीचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न सौरभने केला.
जीवाच्या आकांताने मुलगी ओरडून लागली. मुलीचा आवाज ऐकून रस्त्याने चाललेल्या नागरिकांनी कालव्याकडे धाव घेतली. नागरिकांनी मुलीची सुखरुप सुटका करत सौरभला पोलिसांच्या ताब्यात दिले. सौरभचे वडील साडी परिधान करून फुलं विक्रीची व्यवसाय करत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर सौरभच्या वागण्यात बदल झाला. मृत तृतीयपंथी वडिलांच्या आत्म्याने आपल्याला असे करण्यास सांगितले असल्याचा दावा सौरभने पोलीस चौकशीत केला. सध्या सौरभला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

























































