
श्रीक्षेत्र जेजुरी येथील कडेपठार डोंगरावरील खंडोबाच्या मूळ स्थानाच्या दर्शनासाठी पायऱ्या चढत असताना नाशिक जिल्ह्यातील एका भाविकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. संजय महादू थेटे (वय 55, रा. दिंडोरी, जि. नाशिक) असे मृत भाविकाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय थेटे हे आपल्या कुटुंबासह जेजुरीला दर्शनासाठी आले होते. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कडेपठारच्या डोंगरात भाविकांची मोठी गर्दी होती. गडाच्या पायऱ्या चढत असताना डोंगराच्या मध्यभागी थेटे यांना अचानक दम लागला आणि प्रचंड घाम आला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जागीच कोसळले. यावेळी कडेपठार देवस्थानचे कर्मचारी मयूर खोमणे, शिवाजी भंडलकर, अनिकेत कुदळे आणि धनंजय नाकाडे यांनी तत्परता दाखवत त्यांना उचलून डोंगराच्या पायथ्याशी आणले. तेथून मार्तंड देवस्थानच्या रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. मृत संजय थेटे यांचा दिंडोरी येथे फोटोग्राफीचा व्यवसाय होता, तसेच ते एका दैनिकाचे वार्ताहर म्हणूनही कार्यरत होते.
कडेपठारचे खंडोबा मंदिर जेजुरी गावापासून सुमारे 259 मीटर उंचीवर असून तेथे पोहोचण्यासाठी 750 पायऱ्या चढाव्या लागतात. वयोवृद्ध भाविक तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांना हा डोंगर चढताना मोठा त्रास सहन करावा लागतो. दीड महिन्यापूर्वीही अशाच प्रकारे एका भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर, कडेपठार येथे रोप-वेची सुविधा असावी ही भाविकांची जुनी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. या संदर्भात श्री लिंग देवता कडेपठार देवस्थान शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असून, लवकरच यावर योग्य निर्णय होईल असे देवस्थानचे मुख्य विश्वस्त म्हाळसाकांत जेजुरीकर यांनी सांगितले.

























































