
इराणच्या चिवट प्रतिकारामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सैरभैर झाले आहेत. वारंवार इशारे देऊनही इराण बधत नसल्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी आज इराणी नेत्यांना अक्षरशः शिवीगाळ केली. ‘‘होर्मुझ खुले करा नाहीतर इराणचा नरक करून टाकू. तुमचे सगळे ऊर्जा प्रकल्प आणि पूल उडवून टाकू. मंगळवार हा ‘पावर प्लांट डे आणि ब्रीज डे’ असेल. रात्री 8 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. फक्त बघत राहा,’’ अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली.
इराणने पाडलेल्या विमानातील दुसऱ्या पायलटची अमेरिकेच्या लष्कराने आज सुटका केली. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्या वेळी त्यांनी इराणवर पुन्हा दुगाण्या झाडल्या. ‘होर्मुझ खुला न केल्यास इराणमधील प्रत्येक पूल, प्रत्येक ऊर्जा प्रकल्प त्यांना गमवावा लागेल. ते नशीबवान असले आणि आमच्या हातून वाचले तरी पुन्हा उभे राहण्यासाठी त्यांना 20 वर्षे लागतील,’’ असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेने अल्टिमेटमची भाषा बंद करावी! रशियाचा सल्ला
इराण-अमेरिका संघर्ष निवळावा यासाठी सुरू असलेले प्रयत्न फलदायी ठरतील अशी आशा आहे. मात्र अमेरिकेने अल्टिमेटमची भाषा आधी बंद केली पाहिजे. तरच चर्चेला सुरुवात होऊ शकते, अशी भूमिका रशियाने मांडली. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यातील चर्चेनंतर रशियन परराष्ट्र मंत्रालयाने हे निवेदन जारी केले.
चुकीचे पाऊल उचलू नका, फसाल! इराणचा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांना इराणनेही चोख प्रत्युत्तर दिले. यांची प्रत्येक बेपर्वा कृती अमेरिकेला नरकाच्या दिशेने ढकलत आहे. ट्रम्प हे नेतन्याहू यांच्या सांगण्यानुसार वागले तर संपूर्ण आखात जळून खाक होईल. त्यामुळे ट्रम्प यांनी कुठलीही चूक करू नये. त्यातून काहीही साध्य होणार नाही, असा इशारा इराणी संसदेचे प्रवत्ते कालिबफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला.
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणकडे मंगळवारपर्यंतचा वेळ आहे. अन्यथा इराणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा पेंद्रांना लक्ष्य केले जाईल. सगळे काही एका दिवसात उद्ध्वस्त करू. होत्याचे नव्हते करून टाकू.


























































