IPL 2026 – शमीचा क्लास अन् पंत झक्कास; चुरशीच्या लढतीत हैदराबादवर मात, लखनऊने उघडले विजयाचे खाते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज थरारक सामन्यात प्रारंभ मोहम्मद शमीच्या क्लासने झाला, तर कर्णधार ऋषभ पंतने झक्कास फिनिश करत लखनऊ सुपर जायंट्सच्या चेहऱयावर विजयहास्य फुलवले. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत लखनऊने यजमान सनरायझर्स हैदराबादवर 5 विकेट व एक चेंडू राखून मात करीत आयपीएलमध्ये विजयाचे खाते उघडले. सलामीच्या लढतीत पराभूत झालेल्या लखनऊने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाडय़ांवर सरस खेळ करत बाजी मारली. कमालीच्या अचूक गोलंदाजी आणि त्यानंतर ऋषभ पंतची कर्णधारपदाला साजेशी नाबाद अर्धशतकी खेळी ही लखनऊच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. 18 धावांत 2 विकेट टिपणारा मोहम्मद शमी या विजयाचा शिल्पकार ठरला.

पंतची कर्णधार खेळी

हैदराबादकडून मिळालेले 157 धावांचे लक्ष्य लखनौने 19.5 षटकांत 5 बाद 160 धावा करीत पूर्ण केले. एडन मार्करम (45) व मिचेल मार्श (14) यांना केवळ 37 धावांची सलामी देता आली. ईशान मलिंगाने मार्शला रेड्डीकरवी झेलबाद करून हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. मग शिवांग कुमारने 27 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार ठोकणाऱया मार्करमला लिव्हिंगस्टोनकरवी झेलबाद करून लखनौला दुसरा धक्का दिला. सलामीची जोडी तंबूत पतरल्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने शेवटपर्यंत किल्ला लढवीत कर्णधार खेळी केली. आयुष बदोनी (12), निकोलस पुरन (1) व अब्दुल समद (16) यांना बाद करून हैदराबादने लढतीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका बाजूने उभे असलेल्या पंतने 50 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 68 धावांची खेळी सजवीत अखेरच्या षटकात लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. मुकुल चौधरी 2 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून हर्ष दुबेने 2 फलंदाज बाद केले, तर ईशान मलिंगा व शिवांग कुमार यांना 1-1 बळी मिळाला.

शमीचा डबल धमाका

दरम्यान, लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीने सार्थ ठरविला. त्याने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला भोपळाही फोडू न देता सिद्धार्थकरवी झेलबाद करून सनरायझर्स हैदराबादला जबर हादरा दिला. मग पुढच्याच षटकात त्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या ट्रव्हिस हेडला (7 धावा) मार्करमकरवी झेलबाद करून लखनऊला दुसरे मोठे यश मिळवून दिले. शमीने अवघ्या 8 धावांत हैदराबादची सलामीची जोडी तंबूत धाडून लखनौला सनसनाटी सुरुवात करून दिली.

किशन, लिव्हिंगस्टोनही अपयशी

हैदराबादचा डाव संकटात असताना कर्णधार ईशान किशनवर संघाची मदार होती. मात्र, प्रिन्स यादवने एका अप्रतिम चेंडूवर किशनचा त्रिफळा उडवून लखनौला बहुमोल बळी मिळवून दिला. मग दिग्वेश राठीने लियाम लिव्हिंगस्टोनला (14) यष्टीमागे पंतकरवी झेलबाद करून हैदराबादची 4 बाद 26 अशी दुर्दशा केली.

क्लासनरेड्डीने सावरले

हैदराबादची फलंदाजी दडपणात असताना हेन्रीक क्लासन (62) व नितीश कुमार रेड्डी (56) या मधल्या फळीतील जोडीने दणकेबाज अर्धशतके झळकवत संघाला सावरले. क्लासनने 41 चेंडूंत 5 चौकारांसह 2 षटकार ठोकले, तर रेड्डीने 33 चेंडूंत 5  षटकारांसह 3 चौकार लगावले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 63 चेंडूंत 116 धावांची उपयुक्त भागीदारी केली म्हणून हैदराबादला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. आवेश खानने क्लासनला यष्टीमागे झेलबाद केले, तर मणिमरण सिद्धार्थने रेड्डीला प्रिन्सकरवी झेलबाद केले. हे दोघे दोन चेंडूंच्या फरकाने बाद झाल्याने हैदराबादच्या धावगतीला चाप बसला. लखनऊकडून मोहम्मद शमी, प्रिन्स यादव व आवेश खान यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. दिग्वेश राठी व मणिमारन सिद्धार्थ यांनी प्रत्येकी एक विकेट टिपला.