
30 कॉलेजचे संघ, अपीलकर्ते व प्रतिवादी यांच्यात तगडा युक्तिवाद, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी केलेली उलटतपासणी… दोन्ही बाजूकडून कायदेशीर कौशल्याचे दमदार सादरीकरण… अशा जबरदस्त वातावरणात वडाळय़ाच्या डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात तृतीय राष्ट्रीय प्रतिरूप न्यायालय स्पर्धा उत्साहात पार पडली.
यंदा मुंबईसह महाराष्ट्र व अन्य राज्यातील मिळून 30 विधी महाविद्यालयाच्या संघांनी डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या तृतीय राष्ट्रीय प्रतिरूप न्यायालय स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेत कांदिवलीच्या केईएस विधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. गोव्याचे गोविंद रामनाथ कारे विधी महाविद्यालय उपविजेते ठरले. स्पर्धेचे मुख्य अतिथी न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले. आयुष्यात हार मानू नका, आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा, अपयशाने अजिबात खच्चून जायचे नाही, असा कानमंत्र न्यायमूर्ती जाधव यांनी दिला. शिवाय ऍड. प्रशांत मलिक, ऍड. प्रेमलाल क्रिशनन आणि ऍड. देवेंद्र राजापूरकर यांनी न्यायाधीशाची भूमिका पार पाडली. आंबेडकर महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शोबित खंदारे, मिरल शहा, विवेक करकेरा, नेत्रा जानवलकर, मनीषा जगपात, भक्ती पांचाळ, दिव्याक्षी यादव, सॅबिस्टीयन आदी विद्यार्थ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यात विशेष मेहनत घेतली.




























































