
सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यातील लाचेन-चुंगथांग रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे सुमारे 800 पर्यटक अडकून पडले आहेत. लाचेन-चुंगथांग मार्गावरील तारुम चू पुलाजवळ रस्त्याचे नुकसान झाले आहे. यानंतर मंगन जिल्हा प्रशासनाने तारुम चू पुलाजवळील रस्ता तात्पुरता बंद करण्याची सूचना जारी केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रतिकूल हवामान आणि संभाव्य धोक्यांमुळे लाचेनमधील सर्व पर्यटकांना जिथे आहेत तिथेच थांबण्याचे आणि रात्रीचा प्रवास टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान अनुकूल झाल्यास आणि डोंगक्या ला मार्गावरील बर्फ हटवल्यास अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी सोमवारी बचाव मोहीम राबवण्याची योजना प्रशासनाने आखली आहे. जिल्हा प्रशासन पोलीस, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी), बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बीआरओ) आणि लष्कर संयुक्त बचावकार्य राबवत आहेत.
सिक्कीममधील हवामान पुढील पाच दिवस अस्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 5, 7 आणि 8 एप्रिल रोजी काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून, गारपिटीचीही शक्यता आहे. याव्यतिरिक्त, 8 आणि 9 एप्रिल रोजी सिक्कीमच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

























































