
मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका हिंदुस्थानलाही बसत आहे. देशात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र असून ठिकठिकाणी गॅस सिलिंडसाठी रांगा लागल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवला आहे.
पंतप्रधानांनी गॅस संकट कोविडप्रमाणे हाताळू असे म्हटले होते आणि त्यांनी अगदी तसेच करून दाखवले; मोठ्या घोषणा, शून्य नीती आणि सर्व ओझे पुन्हा एकदा गरिबांच्याच खांद्यावर टाकले, असा टोला राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करून लगावला आहे.
राहुल गांधी यांनी स्थलांतरित मजुरांच्या भीषण वास्तवाकडे लक्ष वेधले आहे. दिवसाला 500 ते 800 रुपये कमावणाऱ्या मजुरांच्या आवाक्याबाहेर आता स्वयंपाकाचा गॅस गेला आहे. दिवसभर कष्ट करून रात्री घरी परतणाऱ्या मजुराकडे चूल पेटवण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. परिणामी, मजुरांनी पुन्हा एकदा शहरांकडून गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या उद्योगांची अवस्था बिकट असल्याचे सांगताना राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले. “जे मजूर कापड गिरण्या आणि कारखान्यांची ताकद आहेत, आज त्यांचाच कणा मोडला जात आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र आधीच अखेरच्या घटका मोजत असून टेक्स्टाईल सेक्टर आयसीयूमध्ये आहे. हे सर्व संकट मुत्सद्देगिरीच्या टेबलावर झालेल्या एका मोठ्या चुकीमुळे आले आहे. ती चूक स्वीकारायला सरकार तयार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
मोदी जी ने कहा था – LPG Gas Crisis को COVID की तरह हैंडल करेंगे।
और सच में वही किया।
बिल्कुल COVID के जैसे ही – नीति शून्य, घोषणा बड़ी, और बोझ गरीबों पर।
₹500-800 की दिहाड़ी कमाने वाले प्रवासी मज़दूरों के लिए रसोई गैस पहुंच से बाहर हो गई है। रात को घर लौटते मज़दूर के पास…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 6, 2026
जेव्हा अहंकार हेच सरकारी धोरण बनते, तेव्हा अर्थव्यवस्था कोलमडते, उद्योग उद्ध्वस्त होतात आणि देश कित्येक दशके मागे फेकला जातो, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. प्रत्येक संकटात सर्वात आधी गरीबच का मरतो? गप्प बसू नका. हा प्रश्न फक्त गरिबांचा नाही, आपल्या सर्वांचा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.


























































