
राज्यासह देशाच्या हवामानात सातत्याने बदल होत आहे. ऐन उन्हाळ्यात उत्तर हिंदुस्थानात गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राष्ट्रीय राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये मेघगर्जना आणि पावसाचा इशारा जारी केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार ७ ते ९ एप्रिलदरम्यान शक्तिशाली पश्चिमी वारे देशाच्या मोठ्या भागावर परिणाम करण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे राजस्थान, दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तर मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणावर गारपिटीची शक्यता आहे.
या प्रणालीचा परिणाम देशाच्या अंदाजे ३०-४० टक्के भागावर होईल. या आठवड्यात दोन पश्चिमी प्रणाली वायव्य हिंदुस्थानकडे सरकत असून, त्यांची सर्वाधिक सक्रियता ७ आणि ८ एप्रिल रोजी अपेक्षित आहे. या प्रभावामुळे अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे.
हवामान विभागाने ७ ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि ईशान्य भारतात सोसाट्याच्या वाऱ्यांसह गारपिटीची आणि पावसाची शक्यता आहे. एका सक्रिय पश्चिमी प्रणालीमुळे उत्तर आणि मध्य हिंदुस्थानातील हवामान सातत्याने बदलत आहे, त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा इशारा आयएमडीने दिला आहे.
७ ते ९ एप्रिल दरम्यान राजस्थान, दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जोरदार गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. ६ ते ८ एप्रिल दरम्यान बिहार आणि झारखंडमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. ८ एप्रिल रोजी पश्चिम मध्य प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये ७ आणि ८ एप्रिल रोजी गारपीट होण्याची शक्यता आहे, तर ८-९ एप्रिल रोजी विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. मध्य, पूर्व आणि दक्षिण हिंदुस्थानात ९ एप्रिलपर्यंत पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे.
पुढील सात दिवस देशाच्या बहुतेक भागांमध्ये दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा कमी किंवा सामान्यच्या जवळपास राहील. यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळेल, परंतु पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढू शकतात आणि शेतीचे नुकसान होऊ शकते.


























































