58 हजार रिक्त पदे भरून पालिकेतील कंत्राटीकरण रद्द करा, म्युनिसिपल कामगार सेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेतील अंदाजे 58 हजार रिक्त पदे भरून कंत्राटीकरण रद्द करा, 5 मे 2008पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करा, साफसफाई करणाऱ्या कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेतील कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे पालिका आयुक्तांना निवेदन पाठवण्यात आले असून या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली आहे. सेवानिवृत्त कामगारांचे आर्थिक देय दावे अदा करण्याची प्रक्रिया जलदगतीने राबवावी, महापालिकेतील सर्व प्रवर्गातील कामगारांना विनाअट कालबद्ध पदोन्नती लागू करावी, कामगारांना हक्काची पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती विहित वेळेत मिळावी, गृह कर्जाची कमाल मर्यादा 10 लाखांवरून 50 लाख रुपये करावी, एम.ए. (मराठी) पदविका प्राप्त कर्मचाऱ्यांना दोन वेतनश्रेणी वाढ बंद केलेली पुन्हा चालू करावी, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील 420 वाहनचालक पदे भरण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी आदी मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत.