
नौपाड्यातील बेडेकर शाळेजवळ शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने उभा राहिलेला ज्येष्ठ नागरिक कट्टा हा शाळेतील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा आधार ठरला होता. महापालिकेच्या स्वच्छता पथकाने या कट्ट्याच्या सफाईकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने या कट्ट्यावर प्रचंड कचरा जमा झाला होता. त्यामुळे हा कट्टा वापरात नव्हता. शिवसैनिकांनी आज श्रमदान करून हा कट्टा चकाचक केला. त्यामुळे आता तो नागरिकांसाठी खुला झाला आहे.
शिवसेना नेते व तत्कालीन खासदार राजन विचारे यांनी त्यांच्या फंडातून जोशी-बेडेकर शाळेच्या बाहेरच हा आखीव रेखीव असा ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारला होता. रणरणत्या उन्हात आणि * धो धो पावसात हा कट्टा नागरिक व विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरला होता. गेले अनेक दिवस या कट्टयाच्या स्वच्छते कडे पालिकेच्या स्वच्छता पथकाने सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे या कट्ट्याच्या परिसरात प्रचंड कचरा आणि धूळ साचली होती. ही बाब लक्षात येताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नौपाडा विभागप्रमुख रमेश शिर्के, शाखाप्रमुख संतोष निकम, नामदेव भोईर, मंगेश जाधव तसेच शिवसैनिकांनी श्रमदान करून साफसफाई केली. त्यामुळे हा कट्टा ज्येष्ठ नागरिकांना आता पुन्हा वापरता येणार आहे.



























































