
ऐन उन्हाळ्यात डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उरणच्या कोप्रोली-पाणदिवे गावात डेंग्यूची साथ पसरली आहे. सध्याच्या घडीला डेंग्यूचे 15 रुग्ण आढळले असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने गावागावात औषध फवारणीची मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, साथीच्या रोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता अलर्ट राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
तालुक्यातील कोप्रोली आरोग्य केंद्राच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पाणदिवे गावात डेंग्यूच्या साथीने अचानक शिरकाव केला. आतापर्यंत कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यूची लागण झालेल्या 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डेंग्यूची साथ पसरल्यानंतर खडबडून जागे झालेल्या उरण आरोग्य अधिकारी व पथकाने संपूर्ण पाणदिवे गावाची तपासणी केली. या तपासणीत पाणदिवे गावात पाणी साठवून ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यात डासांच्या अळ्या आढळून आल्या असल्याची माहिती उरण पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील यांनी दिली.
आरोग्य विभागाने आठवड्यातून काही दिवस हा कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही गावकऱ्यांना करण्यात आले आहे. डेंग्यूच्या साथीची माहिती मिळताच कोकण भवन, रायगड जिल्हा आरोग्य विभागाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणदिवे गावाला भेट दिली.
कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा आणि वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने आधीच नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत.
प्राथमिक केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे किरकोळ आजारांसाठीही रुग्णांना उरण, नवी मुंबई, पनवेल येथील रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती तसेच लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.



























































