
भाताचं कोठार अशी ओळख असलेल्या अलिबागमधील पांढरा कांदासुद्धा राज्यासह देशात प्रसिद्ध आहे. औषधी गुणधर्म असलेलं ‘पांढरं सोनं’ यंदा बक्कळ पिकलं आहे. पाऊस लांबल्याने पांढरा कांदा थोडा उशिराच बाजारात आला असला तरी त्याला बाजारात मोठी मागणी आहे. यावर्षी तालुक्यात 316 हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली होती. यामधून 3 हजार 160 मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन घेण्यात आले असून सुमारे 18 कोटी 96 लाख रुपयांची उलाढाल झाल्यानं बळीराजा खूश आहे.
दोन वर्षांपूर्वीच जीआय मानांकन मिळालेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारुपाला आलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची लागवड यावर्षी 316 हेक्टरवर करण्यात आली होती. त्यातून 3 हजार 160 मेट्रिक टन कांद्याचे उत्पन्न झाले. साधारण प्रति हेक्टरी 10 मे. टन उत्पन्न शेतकऱ्याने काढले असून एका कांदा उत्पादकास सरासरी खर्च वजा करता 2 लाख 50 हजार प्रति हेक्टरी नफा झाला आहे. एकंदरित कांदा विक्रीतून यावर्षी 18 कोटी 96 लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत यांनी दिली. भौगोलिक मानांकन मिळाल्याने पांढऱ्या कांद्याला मागणी वाढली आहे. ग्रामीण भागासह शहरांमधून पांढऱ्या कांद्याला मोठी मागणी आहे. यंदा हवामान चांगले होते. त्यामुळे पीकही जोमाने आले आहे. उर्वरित कांद्याच्या काढणीला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होईल, असे शेतकरी शांताराम पाटील यांनी सांगितले.
‘जीआय’मुळे मिळाली जोळख
तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जाते. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन (जीआय) देण्यात आले. त्यामुळे कांद्याचे ब्रँडिंग होण्यास आता मदत झाली, असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर
व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कांद्याची उचल करत आहेत आणि नवीन कांद्याला चांगला भावदेखील मिळतो आहे. यंदा पाऊस उशिरापर्यंत पडल्याने पाणी मुबलक होते. सध्या लहान कांद्याची माळ 150 ते 200 रुपयांनी विकली जात आहे. सुरुवातीला हाच कांदा 300 ते 350 रुपयांनी विकला गेला.
यावर्षी 316 हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली होती. साधारणपणे 765 शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांद्याचे उत्पन्न घेतले. प्रति हेक्टरी 10 मेट्रिक टन कांद्याचे उत्पन्न झाले असून यासाठी 1 लाख खर्च झाला. हा खर्च वजा जाता 2 लाख 50 हजारांचा लाभ मिळाला, असे शेतकरी समीर भगत यांनी सांगितले.
























































