
मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचे नाव नाही. मंगळवारी पहाटे बिष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला, तर त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर मणिपूरमधील तणाव वाढला असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने 5 जिल्ह्यात पुढील दिवसांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच बिष्णुपूर जिल्ह्यात तातडीने संचारबंदी लागू केली आहे.
बिष्णुपूर जिल्ह्यातील त्रोंगलाओबी अवांग लेकाई गावात मंगळवारी पहाटे संशयित अतिरेक्यांनी एका घरावर स्फोटकं डागली. या भीषण हल्ल्यात घरात झोपलेली दोन निष्पाप बालके जागीच ठार झाली. यात 5 वर्षांचा मुलगा आणि 6 महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश आहे. तर त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. मैतेई आणि कुकी समुदायातील संघर्षाचे केंद्र असलेल्या मोइरांग भागात ही घटना घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, मुलांच्या मृत्यूची बातमी समजताच स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाने दोन ऑईल टँकर आणि एका ट्रकची जाळपोळ केली. अनेक ठिकाणी टायर जाळून रस्ते रोखण्यात आले असून तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या एका पोलीस चौकीचेही नुकसान करण्यात आले आहे. वाढता हिंसाचार पाहता बिष्णुपूर जिल्ह्यात तातडीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
इंटरनेटवर बंदी आणि सरकारी आदेश
राज्य गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपूर या पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा 7 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेपासून बंद करण्यात आली आहे. अफवांना आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले कडक कारवाईचे आदेश
हा मानवतेवर झालेला निर्घृण हल्ला आहे. या कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांना शोधून काढले जाईल आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मणिपूरचे मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह म्हणाले.
STORY | 2 children killed in bomb attack in Manipur, CM condemns
Two children were killed and their mother was injured in a bomb attack in Manipur’s Bishnupur district on Tuesday, triggering protests by locals, police said.
READ: https://t.co/kbUJHsfrYx
VIDEO | pic.twitter.com/9EsxcP7Z2B
— Press Trust of India (@PTI_News) April 7, 2026























































