
हिंदुस्थानचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी IPL 2026 मध्ये खेळाडूंच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याने केवळ फलंदाजी करणे आणि गोलंदाजी टाळणे यावर गावसकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एका सामन्यात गोलंदाजाला फक्त चार षटके टाकायची असतात, मग ते करण्यापासून त्यांना नक्की काय रोखत आहे?” असा बोचरा सवाल त्यांनी विचारला आहे. जे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत, त्यांनी स्पर्धेपूर्वीच माघार घ्यावी, जेणेकरून फ्रँचायझींना दुसऱ्या खेळाडूची निवड करता येईल, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
सुनील गावकर यांनी स्पोर्ट्स्टारमधील आपल्या लेखामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूंच्या या भूमिकेवर बीसीसीआयने कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी गावसकर यांनी केली आहे. लिलावात विकले गेल्यानंतर माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंवर जशी दोन वर्षांची बंदी घातली जाते, तसाच नियम सुरुवातीपासून उपलब्ध नसलेल्या किंवा पूर्ण क्षमतेने न खेळणाऱ्या खेळाडूंसाठीही असावा, असे त्यांनी सुचवले. फ्रँचायझी खेळाडूंवर मोठी गुंतवणूक करतात, त्यामुळे त्यांना खेळाडूंकडून पूर्ण वचनबद्धतेची अपेक्षा करण्याचा अधिकार आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने कॅमेरून ग्रीनच्या बाबतीत दिलेल्या स्पष्टीकरणालाही त्यांनी ‘सबब’ असल्याचे सांगून फेटाळून लावले.
IPL 2026 – विजयरथावर आरूढ दिल्लीला मोठा धक्का; प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचं पुनरागमन लांबलं
या वादाच्या निमित्ताने गावसकर यांनी एका महत्त्वाच्या आर्थिक बाबीवरही प्रकाश टाकला. आयपीएलमधून केवळ खेळाडूच नव्हे, तर त्यांचे क्रिकेट बोर्डही मोठी कमाई करत असल्याचे त्यांनी उघड केले. खेळाडूच्या लिलावाच्या रकमेतील सुमारे 10% हिस्सा संबंधित बोर्डाला ‘एनओसी’ (NOC) शुल्कापोटी मिळतो. अलीकडच्या काळात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांसारख्या देशांच्या बोर्डांनी या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. इतका मोठा आर्थिक फायदा होत असतानाही खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत पारदर्शकता नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.




























































