
रस्ता ओलांडणाऱ्या सहा वर्षाच्या शाळकरी मुलीला डंपरने चिरडल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी रास्ता रोको केला. यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आंदोलकांना शांत करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमच्या चारकोप परिसरात पूजा एन्क्लेव्हजवळ ही घटना घडली. बीएमसी शाळेत शिकणारी सहा वर्षांची मुलगी शाळा सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव डंपरने मुलीला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची भावना उसळली आहे.



























































