
भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी मार्गावरील धानापूरजवळ घडली. या अपघातात सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. गौतम सुरेश निमसरकर (35) व वैशाली गौतम निमसरकर (32) अशी मयत पती-पत्नीची नावे असून ते गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथी रहिवासी आहेत.
गौतम निमसरकर हे पत्नी व मुलीला घेऊन दुचाकीने चंद्रपूरकडे जात होते. दरम्यान, धानापूरजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने सामान्य रुग्णालय गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी पती-पत्नीला मृत घोषित केले. आई, वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने सहा वर्षीय सिया पोरकी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे.
या घटनेने निमसरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.




























































