दोनवेळा रद्द झालेल्या अंदाज समितीचा 8 एप्रिलपासून नांदेड दौरा; जिल्हाधिकार्‍यांनी घेतली आढावा बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात अंदाज समितीच्या अध्यक्षाच्या स्वीय सहाय्यकाजवळ एक कोटीपेक्षा अधिक रक्कम सापडल्यानंतर वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या व दोनवेळा रद्द झालेल्या राज्य विधीमंडळाच्या अंदाज समितीचा दौरा जाहीर झाला असून ८ एप्रिलपासून ते १० एप्रिलपर्यंत हि समिती नांदेड जिल्ह्यात असणार आहे.

धुळे जिल्ह्यात २२ मे २०२५ रोजी अंदाज समितीच्या दौर्‍यात समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक आणि विधीमंडळ कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्या ताब्यातील खोली क्र.१०२ मध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम सापडली होती. आमदार अनिल गोटे यांना हे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केले. ही रक्कम धुळे पोलिसांनी जप्त केल्यानंतर विधीमंडळ नितीमूल्य समितीने किशोर पाटील यांना निलंबितही केले होते.

गतवर्षीच्या मे,जून महिन्यात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने तसेच धुळ्याचे प्रकरण ताजे असल्यामुळे सरकारने त्यावेळी नांदेडचा दौरा रद्द करण्याची शिफारस केली होती. आता ही अंदाज समिती ८ ते १० एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात येत आहे. या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर असून या समितीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार चैनसुख संचिती, प्रशांत ठाकूर, कृष्णा कोपडे, बबनराव कल्याणकर, दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे, मनिषा चौधरी, प्रविण दटके, नमिता मुंदडा, किशोर पाटील, किरण सामंत, दिलीपराव बनकर, शेखर निकम, सरोज अहिरे, राहुल पाटील, कैलास पाटील, नाना पटोले, रोहित पाटील, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीया, सदाशिव खोत, राजेश राठोड, सुनिल शिंदे यांच्यासह मंत्रालयातील विविध सचिवांचाही समावेश आहे.

या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी आढावा बैठक घेवून सदस्यांच्या निवासाची व्यवस्था, दौर्‍यात त्यांच्यासाठी द्यावयाचे अधिकारी, दौर्‍याचे नियोजन, भेटीचे नियोजन याबाबतचा आढाव घेतला. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. समितीच्या या दौर्‍यामुळे प्रशासन सज्ज झाले असून, धुळे येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. संपर्क अधिकार्‍यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून, ही समिती आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.