Ratnagiri News – वेळास समुद्रकिनारी कासव महोत्सवाचा श्री गणेशा; 231 पिल्लांचा अरबी समुद्रात यशस्वी प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कासवांचे गाव’ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या वेळास (ता. मंडणगड) येथील समुद्रकिनाऱ्यावर यावर्षीचा कासव महोत्सव एप्रिल महिन्यात दिमाखात सुरू झाला आहे. कांदळवन विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेला मोठे यश आले असून, आतापर्यंत अंड्यातून बाहेर पडलेली 231 पिल्ले सुरक्षितपणे समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आली आहेत. वातावरणातील बदलामुळे यंदा विणीचा हंगाम काहीसा लांबला असला, तरी पिल्लांचा जन्मसोहळा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने वेळासकडे वळू लागली आहेत, ज्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायालाही चांगली चालना मिळत आहे.

सागरी जैवविविधतेचा महत्त्वाचा दुवा असलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांचे संवर्धन करण्यासाठी कांदळवन विभागाने स्थानिक ‘कासव मित्रां’च्या मदतीने किनाऱ्यावर 32 कृत्रिम घरटी (हॅचरीज) उभारली आहेत. वन्यप्राण्यांपासून संरक्षण आणि भरतीच्या पाण्याचा धोका टाळण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने ही घरटी तयार करण्यात आली असून, त्यात एकूण 3323 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. मॅग्रोव्हजचे आर.एफ.ओ. किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. सागरी पर्यावरण स्वच्छ ठेवण्यात कासवांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याने, त्यांच्या अंड्यांची चोरी किंवा शिकार रोखून सुरक्षित पुनरुत्पादन करण्यावर विभागाने विशेष भर दिला आहे.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा कासवांच्या विणीच्या वेळापत्रकात बदल दिसून येत आहे. 2021 पर्यंत सप्टेंबरमध्ये सुरू होणारा अंडी संरक्षणाचा हंगाम आता जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत लांबला आहे. यावर्षी 4 जानेवारी रोजी पहिले घरटे आढळून आले होते, परिणामी मार्चऐवजी एप्रिलमध्ये कासवांचा जन्मसोहळा सुरू झाला आहे. दरम्यान, वेळास समुद्रकिनाऱ्याचे महत्त्व लक्षात घेऊन या परिसराला ‘समुद्री कासव संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याच्या हालचालीही प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. पश्चिम किनारपट्टीवरील हे महत्त्वाचे प्रजनन स्थळ टिकवण्यासाठी वन विभाग आणि ग्रामस्थ सातत्याने प्रयत्नशील आहेत.