
बदलत्या हवामानाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या वर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने तब्बल 2 लाख 68 हजार 500 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. याचा फटका 4 लाख 28 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बसला आहे.
राज्यात जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण 1 लाख 45 हजार 606 हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून 2 लाख 33 हजार 890 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे पाच लोकांचा मृत्यू आणि नऊ लोक जखमी झाले. अवकाळी पावसामुळे 36 जनावरांचाही मृत्यू झाला आहे.
तर एप्रिल 2026 मध्ये झालेल्या पावसानेही 1 लाख 94 हजार 329 शेतकऱ्यांच्या 1 लाख 22 हजार 993 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे. जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.
128 कोटी 65 लाख रुपयांची मदत
राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी 1 लाख 80 हजार 574 शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचे सुमारे 1 लाख 14 हजार 752 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे 1 लाख 80 हजार 574 शेतकऱ्यांच्या शेती आणि शेतमालाचे नुकसान झाले. या नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना 128.86 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. अवकाळीमुळे प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नुकसान झाले होते



























































