
येऊरच्या जंगलात गेल्या पाच महिन्यांत 4 बिबटय़ांची शिकार झाल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये प्रकाशित होताच वनाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. इतके दिवस लपवून ठेवलेली ही बातमी त्यांनी जगजाहीर केली. पण आणखी खोलात गेल्यावर समोर आले की, येऊरच्या जंगलात पुंपणच शेत खातेय. शिकारीसाठी फासकी लावणाऱ्यांकडे वनाधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून आज यासंदर्भात स्पष्टीकरण देताना चार बिबटय़ांची शिकार झाल्याची जाहीर कबुली देण्यात आली. या प्रकरणी तपास चालू असल्याचेही नमूद करण्यात आले. पण गस्ती पथकाला फासकीत अडकलेल्या बिबटय़ांची माहिती का मिळाली नाही? बिबटय़ांचा वावर असणाऱ्या जंगल क्षेत्रात पॅमेरे असतानाही त्यांच्या नजरेतून का सुटले, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.




























































