
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एका रात्रीत इराणची संस्कृती नष्ट करू’ अशी धमकी दिल्यानंतर साऱ्या जगाच्या नजरा आखाताकडे लागल्या होत्या. मात्र अमेरिका आणि इराणने दोन आठवड्याच्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर आता तणाव निवळला आहे. यामध्ये पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचे स्पष्ट झाले असून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळांना ‘सर्व वाद मिटवण्यासाठी निर्णायक करारावर चर्चा करण्यासाठी’ इस्लामाबादला आमंत्रित केले आहे.
शाहबाज शरीफ यांनी X हँडलवरून एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी दोन्ही देशांनी प्रस्ताव स्वीकारल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधी मंडळांना’शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी सर्व वाद मिटवण्यासाठी निर्णायक करारावर चर्चा करण्यासाठी’ इस्लामाबादला आमंत्रित केले आहे.
शरीफ यांनी लिहिले की, ‘अत्यंत नम्रतेने मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांनी त्यांच्या मित्र राष्ट्रांसह लेबनॉन आणि इतर सर्व ठिकाणी तात्काळ प्रभावाने युद्धविराम मान्य केला आहे.’
With the greatest humility, I am pleased to announce that the Islamic Republic of Iran and the United States of America, along with their allies, have agreed to an immediate ceasefire everywhere including Lebanon and elsewhere, EFFECTIVE IMMEDIATELY.
I warmly welcome the…— Shehbaz Sharif (@CMShehbaz) April 7, 2026
त्यांनी या ‘विवेकपूर्ण निर्णयाचे’ त्यांनी स्वागत केले तसेच दोन्ही देशांच्या नेतृत्वांचे आभार व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, ‘दोन्ही बाजूंनी सामंजस्य दाखवले असून शांतता आणि स्थैर्यासाठी रचनात्मक सहभाग नोंदवला आहे. आम्हाला आशा आहे की ‘इस्लामाबाद चर्चा’ शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी होईल.’
युद्धविरामाची चर्चा
इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनेही युद्धात दोन आठवड्यांचा युद्धविराम स्वीकारल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, शुक्रवारपासून इस्लामाबादमध्ये अमेरिकेसोबत वाटाघाटी केल्या जातील. मात्र, इराणने सावध पवित्रा घेत म्हटले की, ‘याचा अर्थ युद्ध संपले असा नाही. आमचे हात अजूनही ट्रिगरवर आहेत आणि शत्रूकडून थोडीही चूक झाल्यास त्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल.’



























































