कैलास सत्यार्थी यांना ‘लता मंगेशकर’ पुरस्कार, 24 एप्रिलला पुण्यात पुरस्कार वितरण समारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026’ जाहीर झाला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 84व्या स्मृतिदिनी 24 एप्रिल रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिरात होणाऱया कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आज पुरस्कारांची घोषणा केली. अन्य विजेत्यांमध्ये महेश काळे, शमा भाटे, सुबोध भावे, रवीना टंडन आणि प्राजक्ता माळी, सुशील कुलकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ. धनंजय केळकर, आनंद भागवत यांचा समावेश आहे. तसेच ‘मोहन वाघ पुरस्कार – उत्कृष्ट नाटय़ निर्मिती’ हा सन्मान जिगीषा अष्टविनायक निर्मित ‘भूमिका’ या नाटकासाठी दिला जाणार आहे. निर्माते दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांनाही गौरविण्यात येणार आहे. पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात ‘मी लता दीनानाथ’ हा संगीत कार्यक्रम सादर होणार असून त्यात विभावरी जोशी, मधुरा दातार, सावनी रवींद्र, श्रेयसी पावगी, मनीषा निश्चल, ऋतुजा तारे आणि डॉ. उन्मेष करमरकर गाणी सादर करतील.