
पावसाळ्यात मुंबईकरांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये यासाठी रस्त्यांची सुरू असलेली कामे 31 मेपर्यंत पूर्ण करा आणि पावसाळ्यात कोणतेही काम सुरू केले जाणार नाही याची दक्षता घ्या, असे सक्त निर्देश पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी अधिकाऱयांना दिले. पहिल्या टप्प्यातील कामे डिसेंबर 2026 तर दुसऱ्या टप्प्यातील कामे मे 2027 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. रस्त्यांची कामे करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या. रस्ते कामे करताना पालिकेने जल अभियंता विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पाणी पुरवठा विभाग, मलनिस्सारण आदी विभागांशी समन्वय साधून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कामांच्या माहितीसाठी ‘डॅश बोर्ड’ सुरू
रस्ते काँक्रिटीकरणाची माहिती मुंबईकरांना उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेने डॅशबोर्ड सुरू केला असून https://roads.mcgm.gov.in किंवा publicdashboard या ठिकाणी संपर्क साधता येईल.



























































