
परीक्षेच्या ऐन तोंडावरच महाड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाला टाळे लागले आहे. सरकारच्या शिक्षण विभागाच्या या तुघलकी निर्णयाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. आठवी, नववीच्या परीक्षा 11 एप्रिलपासून सुरू असतानाच ही शाळा पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याचा फतवा निघाला असल्याने शिक्षकांच्या बदली झाल्या, आमच्या परीक्षा कोण घेणार, आमच्या भवितव्याची जबाबदारी कुणाची, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.
वाकी बुद्रुक हा डोंगराळ आणि दुर्गम भाग असून येथे कोकण एज्युकेशन सोसायटीचे श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेत अनेक विद्यार्थी रोज 8 ते 10 किलोमीटर पायी प्रवास करून येतात. शाळेची पटसंख्या कमी झाल्याचे कारण देत शासनाच्या निकषानुसार या शाळेतील शिक्षकांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. त्यामुळे शिकवण्यासाठी शाळेत शिक्षकच उरले नाहीत.
विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
पालकांचा आत्मदहनाचा इशारा
या शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा 11 एप्रिलपासून सुरू होणार असतानाच सरकारने शाळा बंद करून विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याची संतप्त भावना पालक आणि ग्रामस्थांनी शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांच्या बैठकीत मांडली. आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा आत्मदहन करू, असा इशाराच यावेळी पालकांनी दिला.
विद्यार्थ्यांना रोज दीडशे रुपयांचा फटका
ही शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना जवळपास 20 ते 30 किलोमीटर दूर असलेल्या बिरवाडी येथील शाळेत शिक्षणासाठी जावे लागत असल्यामुळे त्यांना रोज किमान 150 ते 200 रुपये खर्च येत आहे. अनेक विद्यार्थी हे गरीब आणि शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शिक्षण घेणे कठीण होणार असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली.
पन्नास वर्षांपूर्वी लावलेला वटवृक्ष कोलमडून पडला
पन्नास वर्षांपूर्वी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या दारी शिक्षणाची गंगा यावी यासाठी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या शाळेतून शिकलेले असंख्य विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. पन्नास वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आणि आता हा वटवृक्ष कोलमडून पडला याचे मोठे दुःख आहे, अशी भावना शाळा समितीचे अध्यक्ष महेंद्र महाजनकर यांनी व्यक्त केली.



























































