इंधन टंचाईच्या काळात टेरवमध्ये अवैध कोळसा भट्ट्या पुन्हा धगधगल्या! बंदीला हरताळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
illegal-charcoal-kilns-resurface-in-terav-chiplun-amid-fuel-shortage

आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधन टंचाईची चर्चा रंगली असतानाच चिपळूण तालुक्यातील टेरव गावात मात्र पुन्हा एकदा कोळसा भट्ट्या धगधगू लागल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसची टंचाई असल्याने अवैधरित्या कोळशाचा ‘धूर’ मात्र जोमात निघत आहे. यामुळे कोळसा अवैध भट्टीवाल्यांना सुगीचे दिवस आले असले पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्याप्रमाणात होत आहे.

चिपळूण तालुक्यातील टेरव परिसरात कोळसा भट्ट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसून येत आहे. भल्या पहाटे व रात्री या भट्ट्या राजरोसपणे धगधगत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गावातील लिंगेश्वर मंदिर परिसर, दत्तवाडी रोड, देवशेत, टेरव बुद्रुक, राधाकृष्णवाडी, वेतकोंड आदी भागात या भट्ट्या जोमाने पेटल्या आहेत. कायद्याने लाकूड भट्टीला बंदी असली या भट्ट्या चांगल्याच चालू लागल्या आहेत.

या भट्ट्यांसाठी जंगलातील लाकूड सर्रास तोडले जात असून, त्यातून तयार होणारा कोळसा तंदूर भट्ट्या, हॉटेल व्यवसायिक यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर विकला जातो. विशेष म्हणजे, टेरवचा कोळसा सिंधुदुर्ग ते गोवा पर्यंत पोहोचत असल्याची माहिती समोर येत आहे. दरवर्षी वनविभागाकडून टेरव येथील अवैध कोळसा भट्ट्यांवर कारवाई केली जाते, काही भट्ट्या मोडल्या जातात आणि नंतर पुन्हा नव्याने त्या उभ्या राहतात. एकीकडे इंधन टंचाईचा सामना करत नागरिक चुलीवरचे जेवण बनवत आहेत, तर दुसरीकडे त्या चुलींना ‘कोळशाचा तडका’ देणारे हे भट्टी उद्योग तेजीत आहेत. मात्र या सगळ्या प्रकरणात जंगलतोड, पर्यावरणाचा ऱ्हास आणि कायद्याची पायमल्ली याकडे सोयीस्करपणे डोळेझाक होत असल्याचे चित्र दिसत आहे.