
गुजरातमधील भावनगरच्या राजकारणात सोमवारी एक धक्कादायक प्रकरण घडले. भाजपच्या माजी नगरसेविका सेजलबेन गोहेल यांनी अवघ्या काही तासांत पक्ष बदलत पुन्हा मूळ पक्षात परत येत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.
दुपारी 12:09 वाजता काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत सेजलबेन गोहेल यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत पक्षात महिलांना आणि संविधानाला सुरक्षितता नसल्याचा आरोप केला. स्वतः नगरसेविका असतानाही आपल्यावर दारु तस्करांनी हल्ला केला, मात्र पक्षाकडून कोणतीही मदत किंवा संरक्षण मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले. “जर लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील, तर सामान्य महिलांची अवस्था काय असेल?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपल्या वॉर्डमधील बेकायदेशीर धंद्यांविरोधात आवाज उठवूनही पक्षाने साथ दिली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मात्र, काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन ते तीन तासांतच सेजलबेन यांचे “हृदय परिवर्तन” झाले. दुपारी 3:04 वाजता त्या पुन्हा भाजपमध्ये परतल्या आणि भाजपचा झेंडा हाती घेतला. पक्षात परतल्यानंतर त्यांच्या भूमिकेतही बदल दिसून आला. “माझी चूक मला समजली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मला लालुच देऊन भरकटवले,” असे त्यांनी सांगितले.
अवघ्या ३ तासांत झालेल्या या पक्षांतरामुळे भावनगरच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावरही या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे.




























































