देशभरातील CBSE शाळांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) देशभरातील आपल्या सर्व संलग्न शाळांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थिनींचे आरोग्य आणि स्वच्छता लक्षात घेता, आता सर्व शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता आणि स्वतंत्र स्वच्छता केंद्र (Sanitation Centres) उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे वृत्त ‘दैनिक जागरण’ने दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी

सर्वोच्च न्यायालयाने २० जानेवारी रोजी दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाचा दाखला देत शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भातील सूचना केल्या होत्या. त्यानुसार सीबीएसईने आता सर्व शाळांना अधिकृत पत्र लिहून या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जे विद्यालय या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या नवीन नियमांच्या अंमलबजावणीबाबत देशभरातील सर्व शाळांना वेळोवेळी सीबीएसईला अहवाल सादर करावा लागणार आहे. हा अहवाल मासिक स्वरूपाचा असेल. एप्रिल महिन्याचा मासिक अहवाल ३० एप्रिलपर्यंत जमा करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शाळांमधील विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे.