
IPL 2026 च्या 13 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव केला. गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे षटकांची संख्या कमी करून सामना 11-11 षटकांचा करण्यात आला होता. या विजयासह राजस्थान रॉयल्सने मोसमातील आपला तिसरा विजय नोंदवला असून, दोन महत्त्वाच्या गुणांसह संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. राजस्थानच्या या विजयात सलामीवीर यशस्वी जयस्वालने आक्रमक खेळी करत मोलाचा वाटा उचलला.
सामन्यानंतर ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार स्विकारल्यानंतर यशस्वी जयस्वालने आपल्या खेळीमागचे गुपित सांगितले. तो म्हणाला की, पावसामुळे षटके कमी झाल्याने पावरप्ले फक्त 3 षटकांचाच होता, त्यामुळे पहिल्या चेंडूपासूनच धावा कशा काढायच्या आणि कोणत्या गोलंदाजाला लक्ष्य करायचे याचे नियोजन त्याच्या डोक्यात होते. जेव्हा राहुल चाहर गोलंदाजीला आला, तेव्हा त्याच्यावर हल्ला चढवण्याचा निर्णय यशस्वीने आधीच घेतला होता. परिस्थितीनुसार स्वतःच्या खेळात बदल करणे आणि नवीन शॉट्सचा सराव करणे यामुळेच ही खेळी शक्य झाल्याचे त्याने नमूद केले.
यशस्वीने आपला सलामीचा जोडीदार वैभव सूर्यवंशी याच्या खेळाचेही भरभरून कौतुक केले. वैभव सध्या उत्कृष्ट फॉर्मात असून तो खूप मेहनत घेत असल्याचे यशस्वीने सांगितले. “आम्ही दोघे मैदानात एकमेकांशी सतत संवाद साधतो आणि सकारात्मक राहतो. वैभव स्वतः एक समजूतदार खेळाडू आहे, त्यामुळे मला त्याला वेगळ्या सूचना देण्याची गरज पडत नाही, तो त्याच्या खेळाचा पूर्ण आनंद घेत आहे,” असेही जयस्वालने स्पष्ट केले.



























































