रिकाम्या पोटी कलिंगड खाताय? होऊ शकते आरोग्याचे मोठे नुकसान; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी कलिंगड हे सर्वोत्तम फळ मानले जाते. यामध्ये सुमारे ९२ टक्के पाणी आणि व्हिटॅमिन सी असते. मात्र, आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असणारे हे फळ रिकाम्या पोटी खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. सोशल मीडियावरील हेल्थ ट्रिक्स पाहून अनेकजण सकाळी फळे खाण्याला पसंती देतात, पण कलिंगडाच्या बाबतीत ही चूक महागात पडू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

टीव्ही९ भारतवर्षशी बोलताना जयपूर येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. रोहित शर्मा यांनी रिकाम्या पोटी कलिंगड खाण्याचे ५ मोठे तोटे सांगितले आहेत:

१. रक्तातील साखरेचे प्रमाण (Sugar Level) वाढू शकते

कलिंगडामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. यामुळे मधुमेह (Diabetes) असलेल्या किंवा ‘प्री-डायबेटिक्स’ लोकांसाठी हा मोठा धोका ठरू शकतो.

२. पोट फुगणे आणि गॅसची समस्या (Bloating)

कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटात जडपणा जाणवतो. यामुळे गॅस आणि ब्लोटिंग (पोट फुगणे) सारखे त्रास उद्भवू शकतात. न्याहारीनंतर साधारण १ तासाने कलिंगड खाणे अधिक योग्य ठरते.

३. ॲसिडिटीचा त्रास वाढतो

ज्यांना आधीच ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास आहे, त्यांनी रिकाम्या पोटी कलिंगड टाळावे. रिकाम्या पोटी फळांमधील नैसर्गिक घटकांची प्रतिक्रिया लवकर होते, ज्यामुळे तात्काळ ॲसिडिटी होऊ शकते.

४. इलेक्ट्रोलाईट असंतुलन (Electrolyte Imbalance)

कलिंगडाच्या अतिसेवनामुळे वारंवार लघवीला जावे लागते. रिकाम्या पोटी असे घडल्यास शरीरातील आवश्यक इलेक्ट्रोलाईट्स बाहेर पडू शकतात, ज्यामुळे दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

५. पचनसंस्थेवर परिणाम

ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, त्यांना रिकाम्या पोटी कलिंगड खाल्ल्यामुळे लूज मोशनचा त्रास होऊ शकतो.

तज्ज्ञांचा सल्ला:

कलिंगड हे सकाळी रिकाम्या पोटी खाण्याऐवजी दिवसाच्या वेळी खाणे केव्हाही चांगले. संतुलित प्रमाणात आणि योग्य वेळी सेवन केल्यासच या फळाचे खरे फायदे शरीराला मिळतात.