
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणला ‘संपूर्ण संस्कृती एका रात्री संपवू,’ अशी धमकी दिली होती. त्याआधी त्यांनी इराणला 48 तासांचा अल्टीमेटम देखील दिला होता. मात्र इराणला धमकी दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे. या युद्धविरामासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचे देखील म्हटले आहे. यात युद्धविरामाच्या चर्चेत हिंदुस्थानचा काहीच सहभाग नाहीये, त्यावरून काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
”हिंदुस्थानचे पंतप्रधान – जे अमेरिका, इस्रायल, इराण आणि आखाती देशांशी विशेष मैत्री असल्याचा दावा करतात आणि ज्यांच्याकडे यावर्षी BRICS+ चे अध्यक्षपद देखील आहे. ते युद्धातील शस्त्रसंधीच्या वाटाघाटींमध्ये (ceasefire negotiations) कुठेच का दिसत नाहीत? या वाटाघाटींमध्ये हिंदुस्थान निर्णायक भूमिकेत का नव्हता आणि हे कसे काय? पापा ने वार रुकवा दी का क्या हुआ?”, असा सवाल जयराम रमेश यांनी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर या सोशल मीडियावरून युद्धविरामाची घोषणा केली. त्यात ते म्हणाले की, त्यांनी पाकिस्तानने मांडलेला प्रस्ताव स्वीकारला आहे. या प्रस्तावानुसार दोन आठवडे हल्ले थांबवण्याचे आणि ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) तात्काळ खुली करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रम्प म्हणाले की, अमेरिका या दोन आठवड्यांच्या कालावधीचा वापर इराणसोबतच्या अंतिम करारासाठी करेल.


























































