मुस्लिम पुरुषाचे दुसरे लग्न गुन्हा ठरत नाही, मध्य प्रदेश हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत पुरुष एकापेक्षा जास्त विवाह करू शकत असल्यामुळे पहिल्या पत्नीच्या हयातीत दुसरा विवाह करणाऱ्या मुस्लिम पुरुषावर कलम 494 नुसार गुन्हा चालवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती बी. पी. शर्मा यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील याचिका अंशतः स्वीकारली आहे.

या वेळी कोर्टाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत. कलम 494 तेव्हाच लागू होते जेव्हा पहिली पत्नी हयात असताना केलेला दुसरा विवाह कायद्याने ‘अमान्य’ ठरतो. मात्र मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार, एका पुरुषाला एकाच वेळी चार पत्नी ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे पहिली पत्नी हयात आहे यावरून त्याची दुसरी शादी अवैध ठरत नाही.

पहिल्या लग्नाला झाली 20 वर्षे

जबलपूरच्या मोहम्मद आरिफ अहमद जहांगीर खान याच्यावर पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम महिलेने तक्रारीत म्हटलेय की, 2002 मध्ये विवाह झाल्यानंतर मूल होत नसल्याच्या कारणावरून पतीने तिला मारहाण केली आणि मे 2022 मध्ये दुसरा विवाह केला. तसेच पती तिला परस्पर संमतीने घटस्पह्ट देण्यासाठी दबाव टाकत होता. या तक्रारीनंतर पतीवर द्विपत्नीत्वासह घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे याचिकाकर्ता महिलेने दावा केला होता.

तक्रारदार महिलेच्या लग्नाला 20 वर्षे झाली होती. त्यादरम्यान तिची काहीच तक्रार नव्हती. दुसरे लग्न झाल्यापासून तिने वाट्टेल ते आरोप लावले, असा युक्तिवाद याचिकाकर्त्या मुस्लिम पुरुषाच्या बाजूने करण्यात आला.

पतीविरोधात छळाचा खटला सुरूच राहणार

उच्च न्यायालयाने पतीला अंशतः दिलासा देताना कलम 494 अंतर्गत असलेला द्विविवाहाचा आरोप रद्द केला आहे. मात्र न्यायालयाने हेदेखील स्पष्ट केले की, पत्नीने केलेले इतर गंभीर आरोप, जसे की कलम 498 ए (क्रूरता आणि छळ), कलम 323 (मारहाण) आणि कलम 506 (धमकावणे) या कलमांखालील खटले कनिष्ठ न्यायालयात सुरूच राहतील. केवळ दुसऱ्या लग्नावर गुन्हा दाखल करता येणार नाही. मात्र काwटुंबिक हिंसाचार आणि छळवणुकीच्या आरोपांतून पतीची सुटका झालेली नाही.