
गेली अनेक वर्षे रखडलेला दक्षिण मुंबईतील कामाठीपुराचा समूह पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे. विकासकाची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीनंतर आज म्हाडाने संबंधित विकासकाला स्वीकृती पत्र (एलओए) दिले आहे. स्वीकृती पत्र जारी झाल्यापासून 45 दिवसांत विकासकांना एसपीव्ही कंपनीची स्थापना आणि बँक गॅरंटी भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर वर्प ऑर्डर काढून प्रत्यक्षात पुनर्विकासाला सुरुवात होणार आहे. पुनर्विकासातून रहिवाशांना 500 चौरस फुटांचे प्रशस्त घर मिळणार आहे.
दक्षिण मुंबईतील 34 एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरातील 1 ते 15 या गल्ल्यांमध्ये सुमारे 943 उपकरप्राप्त इमारती आहेत. यामध्ये सुमारे 6625 निवासी व 1376 अनिवासी असे एपूण 8001 रहिवासी वास्तव्यास असून 800 जमीनमालक आहेत. या भागातील इमारती शंभर वर्षे जुन्या आहेत.
n पुनर्विकासातून म्हाडाला एक हजार घरे म्हाडाला उपलब्ध होतील. तर जमीनमालकांना देखील मोबदला दिला जाणार आहे. 50 चौ.मी क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता 500 चौ. फुटांचे 1 घर, 51 ते 100 चौ.मी. क्षेत्रफळाकरिता 500 चौ. फुटांची 2 घरे, 101 ते 150 चौ. मी. क्षेत्रफळाकरिता 500 चौ. फुटांची 3 घरे, 151 ते 200 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता 500 चौ. फुटांची 4 घरे, 200 चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाच्या पुढील प्रत्येक 50 चौ.मी. भूखंड क्षेत्रफळाकरिता 500 चौ. फुटांची 1 अतिरिक्त सदनिका जमीनमालकांना दिली जाणार आहे.

























































