
मानखुर्दमधील सरकारी जमिनीवरील बेकायदेशीर 1400 झोपड्यांवर पालिकेने आज बुलडोझर चालवला. पालिकेचा एम-पूर्व प्रशासकीय विभाग आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी संयुक्तपणे राबवलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेमुळे सरकारची 11 एकर जमीन अतिक्रमणमुक्त झाली.
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यालगत असलेल्या मानखुर्द येथे बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी)च्या शासकीय जागेवर या झोपडय़ा बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्या होत्या. याबाबत अनेक तक्रारीदेखील दाखल करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज पहाटे 3 वाजल्यापासून महापालिकेने कारवाई सुरू केली. संबंधित जमीन जिल्हाधिकाऱयांच्या ताब्यात असून या भूखंडावर पूर्वी विविध प्रकल्पांसाठी आरक्षण टाकण्यात आले होते. काही काळ येथे साबण निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव होता, तर अलीकडे या ठिकाणी बाजारपेठ आणि उद्यान विकसित करण्याचा विचार करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानेही आदेश दिले होते. मात्र याठिकाणी बेकायदा झोपड्या विकास कामात अडथळा ठरत होत्या. त्यामुळे पालिकेतर्फे बेकायदेशीर झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते. तर पोलीस उपायुक्त (परिमंडळ 6) समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ज्यामुळे संपूर्ण कारवाई शांततेत पूर्ण झाली.
कडक बंदोबस्त, 200 कामगार आणि यंत्रसामग्री
- मोठ्या प्रमाणात बेकायदा झोपड्यांवर कारवाई होणार असल्याने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय पालिकेचे 200 कामगार, 3 पोकलेन, 7 जेसीबी, 10 डंपर, 2 ड्रोन कॅमेरे अशी चोख व्यवस्था पाडकामादरम्यान तैनात करण्यात आली होती.
- घाटकोपर-मानखुर्द या जोड रस्त्यालगत असलेल्या मानखुर्द येथील नगरभूमापन क्र. 1/2 (पै) या मिळकतीवर बॉम्बे सोप कंपनी (डब्बा कंपनी) सुमारे 22 एकर जमीन क्षेत्र आहे. यावर मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीरपणे झोपड्या उभारण्यात आल्या होत्या.





























































