
हा सामना कोण श्रेष्ठ हे दाखवणारा होता. बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणं सोपं नाही, विशेषतः 15 वर्षांच्या मुलासाठी. पण वैभव सूर्यवंशीने जो आत्मविश्वास दाखवला त्याला सलाम! कुणीही वयावर जाऊ नका. हा मुलगा मोठं पाऊल टाकायला तयार आहे. हे वक्तव्य हरभजन सिंगचे असले तरी सूर्यवंशीने अवघ्या क्रिकेटला ठणकावून सांगितलेय की, मी सज्ज आहे.
काल साऱयांच्या नजरा वैभवच्या फलंदाजीकडे लागल्या होत्या. हा सूर्य तळपण्याआधी वरुण देवतेने खोडा घातला होता. वाटलं, हे युद्ध पावसात भिजून शांत होईल. पण तसं झालं नाही. वैभवने प्रतीक्षा संपवली. तो आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर जे केलं ते पाहून सारेच थक्क झाले. जगातील सर्वोत्तम गोलंदाज आणि हिंदुस्थानची संपत्ती असलेल्या जसप्रीत बुमराला त्याने थेट सीमारेषेपलीकडे फेकले. तो फटका नव्हता, ती निर्भयतेची घोषणा होती. क्रिकेटच्या खेळपट्टीवर एका नव्या ताऱयाचा उदय होत होता आणि अवघे जग त्याचा साक्षीदार बनले.
खरंच, वैभवला मानले पाहिजे. त्याने प्रामाणिकपणे खेळ केला. आपल्यासमोर असलेला गोलंदाज किती मोठा आहे, तो आपलाच आहे हे सारे विसरून तो मैदानात उतरला आणि त्याने कोणतीही दयामाया दाखवली नाही. तो नेहमीच्या शैलीत उतरला आणि त्याने सर्वांची मने जिंकली.
राजस्थान रॉयल्सने सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सवर हल्ला चढवला. जैसवाल आणि सूर्यवंशी यांनी पहिल्या पाच षटकांतच सामन्याची दिशा ठरवली. जैसवालच्या 32 चेंडूंतील नाबाद 77 धावांच्या तंत्रशुद्ध खेळीने राजस्थानच्या फलंदाजीला ताकद दिली तर सूर्यवंशीच्या 14 चेंडूंतील 39 धावांनी त्या डावाला बळ दिले.
हरभजनने वैभवच मनापासून काwतुक केले आणि तो हिंदुस्थानच्या मुख्य संघात खेळण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. मात्र काहींना वैभवच्या फटकेबाजीचे काwतुक केले नाही. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी स्पष्ट कबुली दिली की, आमच्या योजना होत्या, पण अंमलबजावणी चुकली. सुरुवातीचा फटका महागात पडला.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकन डेल स्टेनने वेगळाच मुद्दा मांडला. बुमरावर केलेल्या हल्ल्यानंतर सूर्यवंशीने गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली आहे. बुमरासारखा महान गोलंदाज आता चूक टाळण्याचा विचार करतोय. कारण चूक झाली तर हा मुलगा षटकार ठोकणार. त्यामुळे आता जशी दहशत बुमराची होती, आता तसाच दरारा वैभवचा असेल. कोणताही गोलंदाज त्याला हलक्यात घेणार नाही.


























































