
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) बुधवारी गुजरातच्या पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. गेल्या महिन्यात एका पत्रकाराला पोलीस अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन कथितरित्या त्याचा ‘शारीरिक छळ’ केल्याच्या वृत्ताची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या वृत्तांचा हवाला देत आयोगाने म्हटले आहे की, संबंधित पत्रकाराचे कपडे उतरवून त्याला उलटे टांगण्यात आले आणि त्याचा शारीरिक छळ करण्यात आला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे.
२२ मार्च रोजी गुजरातमधील राजकोट गुन्हे शाखा पोलिसांनी एका पत्रकाराला ‘बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले’ अशा प्रसारमाध्यमांतील वृत्ताची आयोगाने स्वतःहून (suo motu cognisance) दखल घेतल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.


























































