
भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत असून, शिर्डी पोलिसांनी त्याचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात हालचाली सुरू केल्या आहेत. शिर्डी परिसरातील जमीन व्यवहार आणि आर्थिक फसवणूक प्रकरणाच्या तपासासाठी खरातची कोठडी आवश्यक असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
तपासादरम्यान शिर्डी व परिसरात संशयास्पद जमीन व्यवहार, गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक तसेच आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे समोर आले आहेत. या प्रकरणात आधीच काही संबंधितांची चौकशी सुरू असून, मुख्य सूत्रधार म्हणून अशोक खरातची चौकशी करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.
कोट्यवधी रुपयांचे व्यवहार, संशयास्पद बँक खाती आणि कथित गुंतवणूक योजनांचा तपास सध्या सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शिर्डी पोलिसांना खरातचा ताबा मिळाल्यानंतर या प्रकरणातील अनेक गुपिते समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संगमनेरच्या बँकेत खरातचे खाते!
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक नवा खुलासा समोर आला असून, खरातचे संगमनेरमधील सहकारक्षेत्रात अग्रगण्य असलेल्या बँकेत अधिकृत खाते असल्याची माहिती पुढे आली आहे. या खात्याच्या माध्यमातून अनेक व्यवहार झाल्याची चर्चा आहे.
बँकेतील संशयित व्यवहारांची साखळी आता उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या एका जमीन व्यवहारासाठीदेखील याच सहकार बँकेचा वापर करण्यात आल्याचे समोर येत आहे. या प्रकरणामुळे केवळ भोंदूपणाच नव्हे, तर आर्थिक व्यवहारांचा मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





























































