बीड, महाराष्ट्राचे रेशीम हब! कोयत्यामुळे रापलेल्या हाताला तलम रेशमी साथ; देशातील दुसऱ्या क्रमांकाची रेशीम बाजारपेठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उदय जोशी

पिढ्या‌न्पिढ्या ऊसतोड करून कोयत्याने रापलेल्या साथातांना आता तत्लम रेशमाची साथ मिळाली आहे. ऊसतोड कामगारांना हब’ बनला आहे. एवढेच काय, देशातील दुसऱ्या क्रमांकाची रेशीम बाजारपेठ असण्याचा बहुमानही बीडने मिळवला आहे. ज्या काळात बीडमध्ये गुन्हेगारीला उधाण आले होते, एकमेकांचे खून पाडले जात होते, त्याच काळात मागच्या चार वर्षांत तब्बल साडेसात हजार शेतकरी रेशमाची शेती करत होते.

बैलगाडीला लावलेला कंदील, उन्हातान्हात करपलेले चेहरे आणि पाठीवर संसाराचे विन्हाड घेऊन निघालेला ऊसतोड कामगार… हा आजतागायत बीड जिल्ह्याचा चेहरा! केवळ मतदानापुरताच ऊसतोड कामगारांचा सामाजिक संबंध एवढेच आम्हाला माहिती. ऊसतोड कामगारांच्या जिवावर अनेक जण मोठे झाले. पण ऊसतोड कामगारांची वेदना कधी त्यांना कळलीच नाही. पण या मायाजालातून ऊसतोड कामगार बाहेर पडला. स्वतःची दिशा त्याने ठरवली. पिढ्यान्पिढ्या कोयता वापरून रापलेले हात आता आधुनिकतेची कास धरू लागले. पारंपरिक आणि ऊसतोडीच्या वेळापत्रकावर अवलंबून असलेला शेतकरी आता रेशमाकडे वळला. गेल्या चार वर्षांत बीड जिल्ह्यात अडीच हजार एकरांवर रेशमाची लागवड झाली असून, तब्बल साडेसात हजार शेतकरी रेशमाचे उत्पादन घेत आहेत. रेशमासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या तुतीसाठी थेट बंगळुरूच्या रामनगरकडे धाव घ्यावी लागत होती. आता देशातील रेशीम उद्योजकांची पावले बीडकडे वळत आहेत.

सशक्त तुती आणि दर्जेदार रेशीम

रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने हा उद्योग बहरास आणला. बीड आता महाराष्ट्राचे रेशीम हबच बनले आहे. बंगळुरू पहिल्या क्रमांकावर आणि बीड दुसऱ्या क्रमांकाची रेशीम बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दळणवळणासाठी बंगळुरू परवडत नसल्यामुळे रेशीम उत्पादक बीडला पसंती देत आहेत. तुती आणि रेशीम खरेदीसाठी पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्रप्रदेशासह इतर अनेक राज्यातील व्यापारी बीडची पायधूळ झाडत आहेत. खरेदी-विक्री सुलभ, दळणवळणाची अडचण नसल्यामुळे मागच्या आठवड्यात तब्बल १०३ टन रेशीम बीडच्या बाजारपेठेत उपलब्ध झाले.

कापूस, उसानंतर आता रेशीम…

बीड जिल्हा कापसाच्या गठाणी उत्पादनातही देशात दुसऱ्या क्रमांकावर होता, ऊस आणि साखर उत्पादनातही बीड जिल्ह्याने मोठी झेप घेतली होती. अलीकडे सीताफळ उत्पादनात प्रचंड वाढ झाल्यानंतर केशर आंबा लागवडीतही बीड जिल्ह्याने सात हजार एकर क्षेत्र व्यापले आहे. एकूण फळबाग क्षेत्रच जवळपास ५० हजार
एकरावर पोहोचले असताना आता तुती लागवडीमध्ये मोठी प्रगती केली आहे.

उत्तर भारताच्या रेशीम उद्योगाची मदार बीडवर

रेशीम उद्योगासाठी मिळणारा कच्चा माल आतापर्यंत बंगळुरूहून उपलब्ध होत होता. मात्र दळणवळणासाठी बंगळुरू खर्चिक असल्यामुळे उत्तर भारतासह पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेशातील व्यापारी बीडच्या बाजारपेठेकडे आकर्षित झाले आहेत. दर्जेदार कच्चा माल आणि माफक दरामुळे बीडच्या रेशीम कोषाला मोठी मागणी केली जात आहे.

नफ्याची शेती

बीड जिल्ह्यातील साडेसात हजार एकर क्षेत्रापैकी अडीच हजार एकरवर तुती लागवड आहे. लागवडीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एका वर्षात चार वेळा तुतीचे उत्पादन घेता येते. वर्षाला प्रतिएकरी सहा लाख रुपयांपर्यंत नफा कमावता येतो. म्हणूनच पारंपरिक शेतीला फाटा देऊन बीड जिल्ह्यातील शेतकरी रेशीमच्या तुती लागवडीकडे वळत आहेत.

बीडमध्ये एवढे उत्पादन कसे…

दुष्काळी बीडमध्ये रेशीम उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे वाढले, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्कृष्ट धोरणात आहे. बाजार समितीने स्वतः रेशीम कोषाचे खरेदी केंद्र सुरू केले. एवढेच नाही, तर स्वतःचे सात प्रक्रिया प्रकल्प उभे केले. यानंतर बीडमधील नेकनूर, आडस या भागातही प्रक्रिया केंद्र सुरू झाले. हमखास रेशीम खरेदी या ठिकाणी होते. साधारण ३०० ते ८०० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळतो. यामुळे आतापर्यंत बंगळुरूकडे कच्चा माल घेऊन जाणारे पुणे, नाशिक, जालना येथील शेतकरी आपला रेशीम कोष बीडमध्ये विक्रीसाठी आणू लागले.