
प्राचीन व पवित्र पंढरीचा विध्वंस करू नका, कॉरिडॉर करायचा असेल, तर तो शासकीय जागांवर करा, अशी मागणी करीत पंढरपूरकरांनी शासकीय जागांकडे लक्ष वेधण्यासाठी भव्य दुचाकी रॅली काढली.
पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने कॉरिडॉर विरोधात काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीच्या माध्यमातून पंढरपुरातील अनेक सरकारी, निमसरकारी जागा वर्षानुवर्षे पडीक पडून आहेत. अनेक ठिकाणी अतिक्रमण झाली आहेत. त्याबाबत शोधयात्रा घेऊन त्या जागा प्रकाशझोतात आणण्यात आल्या आहेत. याकरीता ही दुचाकी रॅली काढण्यात आली आहे. यावेळी शहरातील पडीक जागांना प्रत्यक्ष भेट देवून पोलखोल करण्यात आली. यामध्ये खादी ग्रामोद्योग, लोटेवाडी म्हसोबा, फटाका स्टॉल, जिजामाता उद्यान, टिळक स्मारक, जुने कोर्ट, हनुमान मैदान, नगरपालिका दवाखाना, जुनी नगरपरिषद इमारत, लोकमान्य हायस्कूल जुनी इमारत, लिमयेवाडा इमारत, सातमजली दर्शन मंडप, इमारत, स्मशानाजवळचा आगामी दर्शन मंडप, आवास, गजानन महाराज पिछाडीचे पार्ंकग, गाडगे महाराज चौकातील मोकळ्या जागा, यमाई तलाव व तेथील भलेमोठे पार्ंकग, भक्तनिवास, ब्लड बँक जवळील मोकळी जागा, पद्मावती उद्यान, ओपन लॉन आदी जागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या जागांचा अहवाल प्रांत कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या अनेक जागा वर्षानुवर्षे पडीक, विनावापराच्या आहेत. या शासकीय जागांचा सुयोग्य वापर करून एक सुंदर विकास आराखडा वारकरी संप्रदाय पाईक संघ, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती, संतभूमी बचाव समिती यांच्यावतीने शासनाला सादर करण्यात आला होता. त्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये श्री विठ्ठल मंदिर परिसरातील शेकडो घरे, मठ, धर्मशाळा, मंदिरे बाधित होणार आहेत. भाविकांच्या सेवा-सुविधांसाठी शासकीय जागा उपलब्ध असताना खासगी मालमत्ता ताब्यात घेऊ नये, अशी मागणी बाधितांनी केली आहे. रॅलीत 500 पेक्षा अधिक दुचाकी आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते.
ह.भ.प. माउली महाराज गुरव, ह.भ.प. वडगावकर महाराज, बाबाराव महाजन बडवे, वैभव बडवे, व्यंकटेश कुलकर्णी, अनिल गवळी, गणेश लंके, विवेक बेणारे, जव्हेरी, येवनकर, उंडाळे तसेच महिला आघाडीच्या बडवे, डॉ. बेणारे, वट्टमवार, लंके, आगरवाल यांच्यासह पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीतील पदाधिकाऱ्यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?
स्वतःच्या शेकडो एकर जागा पडीक ठेवून लोकांची घरेदारे विकासाच्या नावाने पाडू इच्छिणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा नैतिक अधिकार शासनाला आहे काय? असा सवाल तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगांवकर यांनी रॅलीवेळी उपस्थित केला.



























































