
बीड जिल्ह्यातील केज येथील तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवारी पहाटे लातूर जिल्ह्यातील रेणापूर जवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे महसूल विभागात आणि संपूर्ण जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार राकेश गिड्डे हे आपल्या खासगी वाहनाने प्रवास करत होते. रेणापूर परिसरात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा पार चक्काचूर झाला. या अपघातामध्ये राकेश गिड्डे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि केवळ 31 वर्षांचे तरुण अधिकारी राकेश गिड्डे यांचे अकाली निधन ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. सांगलीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वयाच्या पंचविशीतच आपले यश सिद्ध केले होते.
माहूर आणि नांदेड येथे प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली, ज्याचे फलित म्हणून त्यांना केज (जि. बीड) येथे तहसीलदार म्हणून महत्त्वाची जबाबदारी मिळाली. एक तरुण अधिकारी प्रशासनात किती उत्कृष्ट काम करू शकतो, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले होते. असा उमदा आणि ध्येयवादी अधिकारी आपल्यातून जाणे, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे.





























































