
सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी नको ते धाडस करणे एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. फाशीची रील बनवताना पायाखालचा टेबल सरकल्याने गळफास बसला. कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. जाकीर असे मयत तरुणाचे नाव असून तो वडिलांसोबत कचरा वेचण्याचे काम करायचा.
लाईव्ह हिंदुस्थानने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात राहणाऱ्या जाकीरला इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर रील बनवण्याचे नाद होता. रविवारी दुपारी जाकीर त्याच्या रुममध्ये फाशीची रील बनवत होता. यादरम्यान पायाखालचा टेबल घसरल्याने त्याच्या गळ्याला फास बसला. टेबल पडण्याचा आवाज ऐकून आई धावत आली. बराच वेळ ठोठावून पण जाकीरने दरवाजा न उघडल्याने आईने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश केला.
आत जाऊन पाहिले असता आईला धक्काच बसला. जाकीर फासावर लटकलेल्या अवस्थेत होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला. जाकीरचा मोबाईल तपासला असता सर्व प्रकार उघडकीस आला.



























































