
सिक्कीममध्ये हिंदुस्थान-चीन सीमेजवळील लाचेन आणि चुंगथांग दरम्यानच्या भागात अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे या भागातील रस्ते संपर्क तुटला आहे. या भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे उद्भवलेल्या संकटात अनेक पर्यटक फसले आहे. पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
आतापर्यंत या भागात अडकलेल्या १३५ पर्यटकांना लष्कराने सुखरूप बाहेर काढले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिल्याचे पीटीआयच्या वृत्ता म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाचेन परिसरात अद्याप सुमारे १,००० पर्यटक अडकलेले असून, त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
या भागात ‘त्रिशक्ती कॉर्प्स’ द्वारे ही बचाव कार्य राबवले जात आहे. प्रचंड बर्फवृष्टी होत असतानाही लष्कराचे जवान पर्यटकांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
आतापर्यंत एकूण ३२ कार आणि १० मोटारसायकली बाहेर काढण्यात आल्या आहेत. तीव्र उतार आणि बर्फाच्छादित भागातून नागरी वाहने खेचून नेण्यासाठी लष्करी वाहने तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या बचावकार्यात वैद्यकीय आणीबाणी आणि ज्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, अशा पर्यटकांना प्राधान्य दिले जात आहे.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) लष्कराशी समन्वय साधून काम करत आहे. हा आव्हानात्मक भूप्रदेश आणि खराब हवामान असूनही रस्ते मोकळे करणे, बर्फ हटवणे आणि संपर्क यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम सतत सुरू आहे.
एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आणि त्यांचे आरोग्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आमची पथके जमिनीवर सर्व आवश्यक मदत पुरवण्यासाठी वचनबद्ध आहेत’.





























































