
ठाणे ते भिवंडी मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डिसेंबर 2026 पर्यंत मेट्रोचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून जानेवारी 2027 मध्ये शुभारंभाचा नारळ फुटून ठाणे-भिवंडी मेट्रो सुरू होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आज महापौरांसह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पालिका, एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी एकत्रित पाहणी दौरा करून भिवंडीतील मेट्रो कामाचा आढावा घेतला.
शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू आहे. मेट्रोसह विविध प्रकल्पांसह शहरातील वाहतूक नियोजन यासंदर्भात पालिका मुख्यालयात महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका, एमएमआरडीए व मेट्रो अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत आमदार महेश चौघुले, पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्यासह पालिका, एमएमआरडीए व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर सर्वांनी अंजुरफाटा ते धामणकर नाका दरम्यान सुरू असलेली मेट्रो कामाची पाहणी केली.
स्वच्छतेची जबाबदारीही घ्या
भिवंडी शहरात मेट्रो सुरू होणार असली तरी परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी मेट्रो प्रशासनाने घ्यावी अशा सूचना महापौर नारायण चौधरी यांनी दिल्या, तर मेट्रो परिसरात जाहिरात फलकांच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल असे आयुक्त अनमोल सागर यांनी सांगितले.
मेट्रोचे काम प्रगतिपथावर असून जानेवारी 2027 पर्यंत प्रत्यक्षात मेट्रो धावेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार या परिसरात स्वच्छता, रस्त्यांचे डांबरीकरण झालेल्या ठिकाणी रस्ते बनविणे यासह शहरात सुरू असलेल्या कामांबाबत चर्चा झाली. मेट्रो दरम्यानच्या रस्ते रुंदीकरण व पुढील टप्प्यातील कल्याण रोड परिसरातील रुंदीकरण व इतर कामांना चालना देण्याचे निर्देश महापौरांनी दिले.




























































