
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैश्राम यांच्या घरी एका महिन्याआधी १० मार्च रोजी कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्यामुळे हुडा परिवारात आनंदाचे वातावरण आहे. रणदीपने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट टाकत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. आता रणदीपने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या लहान मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे.
रणदीपच्या या पोस्टमध्ये, त्याची पत्नी लिन लैश्राम मुलीला प्रेमाने आणि आरामात आपल्या मिठीत घेऊन दिसत आहे. त्याचबरोबर रणदीपने या पोस्टमध्ये त्याच्या मुलीचे वर्णन ‘माझ्या जगाचे नवीन केंद्र’ असे केले आहे.
रणदीप हुड्डाने ही हृदयस्पर्शी पोस्ट इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. यात त्याने बाबा झाल्याचा त्याने भावनिक क्षण व्यक्त केला आहे. त्याने केवळ आपला आनंदच व्यक्त केला नाही, तर मुलीच्या नावाचा देखील खुलासा केला. रणदीपने सांगितले की त्याने मुलीचे नाव न्योमिका हुड्डा ठेवले आहे. तसेच रणदीपने पोस्टमध्ये लिहिले आहे की न्योमिका या नावाचा अर्थ देवाचा आशीर्वाद, स्वातंत्र्य आणि आकाशासारखे अमर्याद असा आहे.
View this post on Instagram
आनंद व्यक्त करताना रणदीप आणि लिन म्हणाले की, आमच्या मुलीचे नाव ठेवणे हा आमच्यासाठी एक खूप खास आणि भावनिक क्षण होता. ‘न्योमिका’ हे नाव ऐकताच आम्हाला वाटले की हेच योग्य नाव आहे. पालक म्हणून आम्ही या नवीन प्रवासातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहोत.





























































