
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री एका घरात घुसून मायलेकीवर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात २३ वर्षीय काजलचा मृत्यू झाला असून, तिची ५८ वर्षीय आई लीलावती देवी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, रामकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोरवन परिसरात हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या घरात झोपलेल्या असताना मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने छतावरून घरात प्रवेश केला आणि मायलेकीवर ॲसिड ओतले. त्यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून पडवीत झोपलेले काजलचे वडील प्रभुनाथ यादव घरात धावले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाला होता. मायलेकींची गंभीर प्रकृती पाहून त्यांना तातडीने कुशीनगर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना गोरखपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान काजलचा मृत्यू झाला, तर तिची आई मृत्यूशी झुंज देत आहे.
घटनेची माहिती मिळताच गोरखपूर परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस हल्लेखोराचा कसून शोध घेत आहेत.



























































