गोराईतील एमटीएनएलच्या जागेवर पंतप्रधान योजनेतील घरे बांधणार; उर्वरित जागा खासगी विकासकाकडे जाण्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकेकाळी मुंबईची दळणवळण वाहिनी असलेली एमटीएनएल जवळजवळ बंद पडली. मुंबईतल्या मोक्याच्या जागांवर असलेल्या या जागांवर केंद्र सरकारपासून अनेक खासगी विकासकांचा डोळा आहे; पण आता गोराईतील एमटीएनएलच्या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे होणार आहेत. मुंबईतला हा सर्वात पहिलाच प्रकल्प आहे.

मुंबईत शिवाजी पार्क, प्रभादेवी, कुलाबा, बीकेसी तसेच पश्चिम अशा मोक्याच्या जागा एमटीएनएलच्या ताब्यात होत्या. आता घरोघरी मोबाईल आल्यामुळे एमटीएनएलच्या लँडलाईन इतिहासजमा झाल्या. एमटीएनएल आता शेवटच्या घटका मोजत आहे. या इमारती जवळजवळ संपूर्णपणे रिकाम्या आहेत. या इमारतींच्या काही जागेतून एमटीएनएलच्या लँडलाईन खासगी कामगारांच्या मदतीने चालवल्या जात आहेत. मुंबईतल्या या जागांवर केंद्र सरकारचा पूर्वीपासून डोळा आहे. आता या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतची परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत.

बोरिवली येथील गोराई येथे भारत संचार निगम लिमिटेड यांच्या मालकीची, तर शिंपोली येथे महानगर टेलिफोन निगमची जागा असून दोन्हींची मिळून एकूण 28.84 एकर जागा आरक्षित आहे. ही आरक्षित जागा रेडिरेकनर दरानुसार 729 कोटी रुपयांना घेऊन या आरक्षित जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा प्रकल्प राबविण्यास तसेच उर्वरित आरक्षित जागा विकसित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने बैठकीत ठेवला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. या जागेवर सुमारे एक हजाराहून अधिक घरे बांधण्याचा प्रस्ताव असल्याचे आहे.