
बेस्ट उपक्रमाच्या अभियांत्रिकी विभागातील रखडलेल्या पदोन्नतीच्या प्रश्नावर अखेर सकारात्मक तोडगा निघून संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी 3 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून बेस्ट उपक्रमाच्या जनरल मॅनेजर सोनिया सेठी यांच्या समोर अभियांत्रिकी विभागातील पदोन्नतीच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यांच्या पुढाकारामुळे यानंतर आमदार सुनील शिंदे यांनी नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात या विषयावर प्रश्न उपस्थित करून तो विधानसभेच्या पटलावर मांडला. तसेच बेस्टच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.
शिवसेना उपनेते-आमदार, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन अहिर, सरचिटणीस नितीन नांदगावकर, उमेश सारंग आणि अण्णा वाळवेकर यांनीही सातत्याने पाठपुरावा करून या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अभियांत्रिकी विभागातील कर्मचाऱयांचा पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. अधिकारी वर्गानेही ही प्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.




























































