
मुंबईहून बंगळुरूला जाणाऱया एअर इंडियाच्या विमानाचे एक इंजिन हवेत अचानक बंद पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. त्यामुळे विमानाचे संतुलन बिघडले. अखेर वैमानिकाने प्रसंगावधान राखत ‘पॅन-पॅन’ असा कॉल देत विमान पुन्हा मुंबई विमानतळावर लँडिंग केले आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी विमानात जवळपास 47 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
एअर इंडियाचे ए 320 निओ विमान गुरुवारी मध्यरात्री साधारण अडीच वाजण्याच्या बंगळुरूसाठी रवाना झाले होते. उड्डाण होताच काही मिनिटांतच विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते बंद पडले. इंजिन निकामी झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने तत्काळ हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला अत्यंत कौशल्याने दुसऱया इंजिनच्या मदतीने विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवले.



























































