
मथुरेतील वृंदावनमध्ये भाविकांनी भरलेली बोट उलटून 10 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. यमुना नदीच्या केशी घाटाजवळील पिपा पुलाला धडकल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेदरम्यान बोटीत अंदाजे 25 ते 30 भाविक होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्ती निवारण पथकाने घटनास्थळी धाव घेत स्थानिक गोताखोरांच्या मदतीने 14 भाविकांना सुखरूप बाहेर काढले आहे. अद्याप काही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
श्री बांके बिहार मंदिरापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर केशी घाट आहे. या घाटातून प्रवास करताना आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास हवेचा वेग जास्त असल्याने बोट पीपा पुलाला धडकली. बोटीचे संतुलन बिघडल्याने ती एका बाजूला कलली आणि काही सेकंदांमध्ये बुडाली. बोटीत बसलेले सर्व भाविक पंजाबमधील रहिवासी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं 50 गोताखोरांच्या मदतीने मदत कार्य करत आहेत.



























































