
ठाणे महानगरपालिकेने सफाई कामगारांना चक्क बीएलओ केले असून त्यांना मतदार याद्यांच्या कामासाठी जुंपले आहे. सफाई कामगारांसह बिगारी, शिपाई अशा चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनादेखील ही कामे देण्यात आल्याने मतदार याद्या कितपत निर्दोष होतील याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या कामगारांना देण्यात आलेले प्रशिक्षणदेखील त्यांच्या डोक्यावरून गेले असून मतदार याद्यांचे नेमके काम कसे करायचे याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. यानिमित्ताने ठाणे पालिका प्रशासनाचा अजब-गजब कारभार समोर आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी एसआयआर मोहीम राबवण्यात येत आहे. कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर, ओवळा-माजिवडा आणि कळवा, मुंब्रा विधानसभा मतदारसंघात घरोघरी जाऊन याद्यांमध्ये मतदार पुनर्नोदणी, पुनर्रचना, मतदारांची पडताळणी करण्यासाठी पालिका प्रशासनाने 1 हजार 669 बीएलओंची नियुक्ती केली आहे. निवडणूक विभागाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पदासाठी चतुर्थ श्रेणीतील कामगार नेमले आहेत. यात कमी शिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रशिक्षण कार्यशाळेत या कामगारांचा गोंधळ होत असल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
ठाणे महानगरपालिका
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणीत सफाई कामगार, बिगारी, शिपाई आदी संवर्गात मोडत असून त्यांची शैक्षणिक पात्रता कमी आहे.
शैक्षणिक पात्रता कमी असल्यामुळे मतदारांशी संवाद साधताना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे मतदारांमध्ये गैरसमजही निर्माण होत आहेत.
कर्मचारी आमदारांच्या भेटीला
ठाणे पालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ‘बीएलओ’चे कामकाज सोपवण्यात आलेले आहे. दरम्यान 35 हून अधिक कर्मचाऱ्यांनी आज भाजपचे आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. केळकर यांनी तत्काळ महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधून बीएलओ पदावर चतुर्थ श्रेणी कामगारांना नियुक्त करू नये असे सांगितले.
चुका झाल्यास आम्हाला जबाबदार ठरवू नये
सफाई कामगारांच्या शैक्षणिक पात्रतेच्या अभावी आधुनिक मोबाईल हाताळणी करणे त्यांना शक्य होत नाही. तसेच इतर बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. त्यांच्याकडे सोपवलेल्या कामकाजात बऱ्याचदा चुका होत आहेत. दरम्यान काही चुका झाल्यास आम्हाला जबाबदार ठरवू नये, असे पत्र ठाणे पालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी संजय केळकर यांना दिले आहे.



























































