
काशिमीरा येथील लक्ष्मी बाग परिसरात असलेल्या शहा सिड कंपनीमध्ये १५ हजार लिटर अॅसिडचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या टँकरचा आज अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की प्रचंड आवाज आणि धूर यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. उग्र वासाने नागरिक व कामगारांना श्वास घेणेही कठीण झाले. स्फोटामागील कारण अजून समजले नाही. दरम्यान, दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या वेळी ही घटना घडल्याने कंपनीतील अनेक कामगार बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचा जीव वाचला, तर अडकलेल्या इतर कामगारांना वेळीच बाहेर काढले. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
शहा अॅसिड कंपनीमध्ये गेल्या काही वर्षांपासून टँकरने अॅसिडचा पुरवठा केला जातो. अॅसिड रिकामे करीत असताना पूर्ण खबरदारी घेणे आवश्यक होते, पण कंपनी मालकाकडून कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती. याबाबत परिसरातील काही रहिवाशांनी महापालिका व प्रदूषण विभागाकडे तक्रारदेखील केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज दुपारी 15 हजार लिटरने भरलेला अॅसिड पुरवठा करणारा टँकर कंपनीत आला होता. त्यातील अॅसिड काढण्याचे काम सुरू असताना टँकरच्या पाठीमागील बाजूने स्फोट झाला. यावेळी टँकरमधील अॅसिड आजूबाजूला पसरल्याने दुर्गंधी पसरली होती. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.


























































